स्वामी घरी आले !
मी तसं म्हणलं तर आस्तिक आहे पण अनुभूती, चमत्कार, दृष्टांत अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. देव म्हणजे माझ्या साठी एक प्रचंड शक्ती चा source आहे आणि त्याच्या वरची माझी श्रद्धा ही मुख्यत्वाने मला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे आणि त्या शक्ती चा आधार घेऊन जे काही आयुष्यं समोर ठेवेल त्याला हसत सामोरे जायची प्रेरणा मिळते असं मी मानते. त्याच्या नामस्मरणातून शांती मिळवणे आणि त्याच्या भक्तीमधून स्वतःचा मार्ग शोधणे हा माझा प्रयत्न राहिला आहे.
माझ्या आई चं आणि काही नातेवाईकांचं वेगळं आहे. ते बऱ्याचदा अनुभूती, साक्षात्कार, स्वप्नात देवाने किंवा गुरूंनी दर्शन देणे किंवा काही प्रचिती येणे ह्या बाबतीत बोलत असतात. मी आई ला नेहमीच तोडत आले.
"आई तुझं काहीही असतं हा, असं काही अनुभूती किंवा दृष्टांत वगैरे नसतं. आपल्या मानण्यावर सगळं असतं"
"अगं मना श्रद्धा तेथे प्रचिती.. तुला नाही कळणार.. "
आमचं हे असं discussion बऱ्याचदा झालंय आणि नेहमीच मी असे विषय उडवून लावायचे.
आईमुळे आणि बाबांमुळे श्री शिर्डी साईबाबा, श्री गजानन महाराज ह्यांचं घरात खूप केलं जातं. पूजा, ग्रंथपाठ वगैरे बाकी देवांबरोबर केलं जातं. गुरुवारचा नैवद्य ही आमच्या कडे चालत आला आहे. मी ही नेहमी करत आले आणि जसं सांगितलं तसं मनोभावे सगळं केलं. कधी शंका नाही घेतली पण कधी अनुभूती ही अशी आली नाही. माझे प्रॉब्लेम्स सुटले की तीच अनुभूती आणि तीच प्रचिती असं मी मनात आणलं. आणि देवाचे, गुरूंचे आभार मानून पुढे चालतं राहिले.
माझ्या मुलीच्या वेळीस प्रेग्नन्ट असताना, मला youtube वर असच कधीतरी "तारक मंत्र" स्वामी समर्थ असं suggestion आलं. तसं तिन्ही सांजेला देवाचं काही ना काही लावून ऐकण्याची सवय असल्या मुळे youtube ने ते suggest केलं असणार. पण कस का कोण जाणे, त्या दिवशी मी तारक मंत्र ऐकला. खूपच आवडला, खूप शक्ती मिळाल्यासारखं वाटलं. खरं तर स्वामी समर्थांविषयी असं खूप काही कुणाकडून डायरेक्ट ऐकलं नव्हतं. facebook वर किंवा बऱ्याच मित्र, नातेवाईकांनी त्यांचे अनुभव किंवा स्वामी भक्ती share केलेली पहिली होती. बाबा मला नेहमी गुरुवारी विडिओ वर स्वामींच्या मठात जाऊन (चिंचवड च्या) त्यांचं दर्शन कारवायचे. पण तेव्हा देखील मी एक देव म्हणून दर्शन घ्यायचे. आई ही त्यांचं नामस्मरण करायची पण मी असं खूप काही कधी कनेक्ट केलं नव्हतं.
पण कसं कुणास ठाऊक मी आपोआप तारक मंत्र आणि स्वामींचा जप चालू केला. जास्तं विचार नं करता आणि करत राहिले. डिलिव्हरी मध्ये पण सारखं नामस्मरण स्वामींचं आणि कुलदैवताचे करत बळ मागत राहिले. डिलिव्हरी नॉर्मल पार पडली आणि सगळं काही मार्गी लागलं. करोना चं चालू झालं आणि एकदा अशीच मी बसले असताना विचार करत राहिले, कोण स्वामी? मी त्यांचं का करायला लागले? कधी आयुष्यात एकदाही ना स्वतःहून त्यांच्या मठात गेले, ना अक्कलकोट ला, ना कधी त्यांचं काही केलं. मग असं का करतेय मी? ना मला त्यांची काही स्टोरी माहिती ना काहीही इतिहास, ना आईने कधी फोर्स केला की तू त्यांचं कर. मग मी का करतेय? माझं त्यांचं काय connection? मी उगीच कशात तरी आधार शोधतेय का? बरं माझ्या घरातल्या देवघरात ना घरात कधी स्वामींचा एकही फोटो नाही. जे काही स्वामींचे फोटो पहिले ते social media वर. बाकी गुरु व देव ह्यांना मी किंवा घरचे वर्षानुवर्षे मानत आले आहेत त्यांचं मी करतेच. त्यातून देखील मला शक्ती मिळत राहते. देव/गुरु सगळे शेवटी एकच. मग मी ह्या स्वामींचं का करतेय? किंवा मी ह्यांच्यावर श्रद्धा किंवा विश्वास का ठेवावा?
असे सगळे विचार मनात घर करू लागले. खरं तर नकळतपणे स्वामींचं नामस्मरण त्या youtube video मधून रोज करायला लागून मला ६/७ महिने झाले होते. पण अजूनही मी समजून उमजून कनेक्ट होऊन करत नव्हते. माझ्या नकळत तारक मंत्र मला शक्ती देत होता पण मनाला सारखे प्रश्ण पडत होतेच. की एवढे देव व गुरु ह्यांचं करत असताना हे मी का करतेय, काय गरज त्याची.. असा बराच विचार करता करता कधी नव्हे आणि कुणास ठाऊक का माझ्या मनात सहज आलं -
"अशक्य ही शक्य करतील स्वामी.."
स्वामी हे खरंच असेल आणि तुम्ही खरंच असाल, तुम्ही म्हणजे तुमची शक्ती जर खरंच माझ्या सोबत असेल तर मला प्रचिती द्या. मला सगळे सांगतात की त्यांना ह्या गुरूंची प्रचिती आली, ह्या देवाचा साक्षात्कार झाला, हे स्वामी स्वप्नात आले.. मग मला का कधी असे अनुभव येत नाहीत? देव सगळीकडे असतो, माणसात, प्राण्यांत, निसर्गात आणि तो आपल्याला वेगवेगळ्या रूपाने मदत करत असतो. सगळं मान्यं आहे, आजच्या युगातल्या माझ्या मेंदूला पटते देखील. माझ्या डिलिव्हरी मध्ये साथ देणारी ती nurse, कॉम्प्लिकेशन आल्यावर धावून आलेली माझी डॉक्टर, अशा कठीण प्रसंगी साथ देणारी माझी आई, नवरा, मैत्रिणी ही सगळी देवाचीच रूपं आहेत. सगळं सगळं मान्य!
पण तरीही मला अजून पटत नाहीये.. की मी तुमचं का करतेय? तुमचा साधा एक फोटो ही नाही आहे माझ्या कडे. बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं की त्यांना आपोआप कुणी ना कुणी स्वामींचा किंवा साईबाबांचा फोटो दिला किंवा मिळाला असं. ह्या करोना मध्ये, ते ही अमेरिकेत कुणी फोटो आणून द्यायचा संबंध ही नाही. इकडे दूर दूर वर कुठे तुमचा मठ नाही, ना कुणा तुमच्या भक्तांशी माझी ओळख. मग मी का करतेय हे? मला उत्तर द्या, मला अशक्य ते शक्य करून दाखवा. आणि मी एका लहान मुलीसारखी, challenge केल्या सारखी स्वामींना म्हणले.. "खरंच असाल सोबत तर घरी येऊन दाखवा.. तरच मी मान्य करेन. नाहीतर मी तुमचं करत राहीन, मंत्र कानाला मधुर लागतो आणि शक्ती शब्दातून देतो म्हणून ऐकत राहीन पण कुठे ना कुठे ते कनेक्ट मात्र कधीच होणार नाही"...
असं त्या दिवशी विचारांचं वादळ आलं आणि निघून गेलं. दुसऱ्या दिवशी विसरून, स्वामींना मनात म्हणले कि -" क्षमा करा मी जरा वेड्यासारखाच विचार केला काल.. तुम्ही सगळे एकच आहात, माझा माझ्या आराध्यावर विश्वास आहे आणि तुम्ही त्याचीच रूपे आहात".. देवांना सकाळी नमस्कार केला आणि दिवस पुढे चालू राहिले..
१/२ महिने गेले.. मी विसरून ही गेले.. एकदोनदा विचार आला, तेव्हा स्वतःशीच हसले आणि "किती बावळट आहे मी, एक तर वेड्या सारखा विचार आणि त्यात ह्या अशा परिस्थितीत जेव्हा कुठे कुणी जाऊ शकत नाही, ना कुणी आस पास भारतीय राहणारे.. त्यातून मराठी आणि स्वामींना मानणारे फोटो देतील अशा personal ओळखीचे तर कुणीच नाही.. काहीही असतं माझं!! देव आहे आणि ह्या स्थितीत एवढ्या लोकांच्या रूपाने तो मदत करतोय, अजून कसली प्रचिती हवी?" असा विचार लगेच करून पुढे सोडून दिलं.
पुढे एका महिन्याने ऑफिस मधून सगळ्या लोकांना घरी ऑफिस चं सामान खर्च करून घेण्यासाठी - म्हणजे कॉम्प्युटर, डेस्क, खुर्ची असं वगैरे ऑफिस चा सेटअप घरी करता यावा आणि पुढचे दिवस comfortable काम करता याव, ह्यासाठी काही रक्कम मिळाली. सामान खर्चून पावती द्यायची (म्हणजे जे ऑफिस ने allowed केलंय तेच घ्यायचं, रोख रक्कम नाही). मी लगेच खुश होऊन टेबलं, कॉम्पुटर, मॉनिटर, कीबोर्ड वगैरे अशा गोष्टी घेतल्या आणि माझं छोटंसं ऑफिस सेटअप केलं. थोडी रक्कम claim करायची राहिलीच, तर माझा नवरा म्हणाला - "
अगं मला काही ना काही कामासाठी कागदपत्रे प्रिंट करावी लागतात, मी त्यामुळे प्रिंटर घेणारच आहे. ऑफिस देत असेल तर त्या रकमेत घेऊ. "
"प्रिंटर कशाला येईल अरे, ऑफिस च furniture allowed आहे, प्रिंटर furniture मध्ये येत नाही, आणि असा उगाच कशाला घ्यायचा? फालतू खर्च!" -- मी
"अगं.. विचारून तर बघ मॅनेजर ला"
"काहीही, प्रिंटर कुठे वापरतं कोण ऑफिस मध्ये एवढं. कधीतरी होतं use"
"तरी एकदा विचार, तसेही ते पॆसे जाणारच आहेत, विचारायला काय हरकत मग"
"okay, विचारते .. "
असं म्हणून वैतागून मी नवऱ्यासाठी ऑफिस मध्ये विचारलं, तर सगळ्याच colleagues नी प्रिंटर घेतला होता. प्रिंटर हा ऑफिस मधून दिला होता कारण ह्या परिस्थितीमध्ये बाहेर जाऊन कागदपत्रे प्रिंट किंवा स्कॅन करणे अवघड आहे, त्या सोबत काही काही कामासाठी लागणारच म्हणून ऑफिस ने तो allow केला होता. मला जाम आश्चर्य वाटलं! आणि त्याचबरोबर नवऱ्याला एकदम जग जिंकल्या सारखं वाटलं :) कितीही मोठे झालो आणि कितीही कमावलं तरी फ्री काही मिळालं की छान वाटतं! माणसाचा स्वभाव :)
आम्ही दोघेही खूष झालो ! चला आता visa ची कागदपत्रे, काही टॅक्स किंवा बाकी documents प्रिंट करायचे म्हणले तर बाहेर जावं नाही लागणार !
काही दिवस गेले आणि प्रिंटर आला. मजा म्हणजे तो गुरुवार होता. काही ध्यानी मनी नसताना, नवऱ्याने प्रिंटर ओपन केला. आनंदाने नवरा -
"चल, मी ओपन करतोय प्रिंटर. बघू quality कशी आहे ते, सगळं टेस्ट करून घेऊ.. "
"okay चलो".. मी आणि लहान मुलगा दोघेही excited !
"काय करायचं प्रिंट?"
"dadda कार चं चित्र ! मला रंगवायचं" - मुलगा
"अरे पहिल्यांदा कुठलीही गोष्टं देवासमोर ठेवतो ना आपण, मग देवाचं काहीतरी करू ना प्रिंट" - मी अगदी नकळतपणे म्हणले.
"good idea, एक काम करू मग. तू तारक मंत्र ऐकते ना, स्वामी समर्थांचा फोटोच करू की प्रिंट मग" -
नवरा असं म्हणला आणि मला एकदम शॉक बसला.. !! अचानक ट्यूब पेटली..
ना ध्यानी, ना मनी .. अगदी जसं नकळतपणे मी स्वामींचं करायला लागले होते, तसंच अगदी नकळतपणे स्वामींनीही अशक्य ते शक्य करून दाखवलं होता!
covid मध्ये कुठेही न जाऊ देता, कुणालाही न पाठवता स्वामी घरात आले !
तसं पाहिलं तर कुणी ह्याला coincidence म्हणेल तर कुणी काहीही. पण माझ्या साठी मात्रं ही अनुभूतीच स्वामींनी मला दिली. ध्यानी मनी नसताना, कशाची कुठे लिंक नसतानाही स्वामींनी मार्ग काढून घरामध्ये प्रवेश केला! आपण movie चा डायलॉग ऐकलाय ना "अगर शिद्दत से किसी चीज को चाहो तो पुरी कायनात उसे अपने पास लाने मै मदत करती है" तसंच काही स्वामींनी केलं. त्यांनी मला हे दाखवलं की हो, "भिऊ नकोस मी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या सोबत आहे, मी सगळीकडे आहे"!
गुरुवारचा नैवैद्य आणि आरती करून ती प्रिंट आम्ही काढली आणि स्वामींचा फोटो इच्चीत जागेवर लावला!
अशक्य ही शक्य झालं, स्वामी घरी आले !
श्री स्वामी समर्थ!
Comments
Post a Comment