ऋणानुबंध
जोशी आज्जी आणि माझी ओळख अगदी अलीकडचीच. दोन अडीच वर्षं झाली असावी.. आम्ही नव्या घरात शिफ्ट झालो आणि काहीच दिवसात क्रिशय च्या आगमनाची चाहूल लागली. डॉक्टरांनी दोघांनाही प्रेग्नन्ट घोषित केलं आणि आमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. आज काल अमेरिकेत म्हणा किंवा इंडिया मध्ये म्हणा डॉक्टर आवर्जून दोघांना pregnant म्हणतात.. ही जाणीव करून द्यायला कि दोघांचीही प्रत्येक phase मध्ये equal जबाबदारी आहे. अगदी बाळ पोटात असल्यापासूनच. नवरा प्रेग्नन्ट आहे असं म्हणलं की हसू येतं पण ती रिऍलिटी नाही का.. त्याला हि तेवढाच प्रवास पार करायचा असतो बायको च्या सोबतीने!
असो.. तर आमच्या अनियमित आयुष्याला नियमबद्ध करायची वेळ आली आणि आम्ही काही नियम आखून घेतले. त्यातला एक म्हणजे ऑफिस वरून आल्यावर फ्रेश होऊन walk ला जायचं. लगेचच दुसऱ्या दिवसापासून चालू केलं. जसे जसे दिवस जाऊ लागले तसे काही ठराविक चेहरे नियमित पणे दिसायला लागले आणि नव्या ओळखी वाढू लागल्या. एखादा महिना झाला असावा आणि त्या चेहऱ्यांमध्ये एका चेहऱ्याची भर पडली. ती म्हणजे जोशी आज्जी.
आज काल आज्ज्यांच्या व्यक्तिमत्वाची image बदलली आहे. आज्ज्या पण इतक्या modern राहतात आणि छान कॅरी करतात स्वतःला कि तरुणींना लाज वाटावी. exercise ट्रॅक पँट्स - टी शर्ट, स्पोर्ट्स शूज आणि घट्ट वेणी गुंडाळून वर clutcher ने बांधलेला अंबाडा. आपल्या अमेरिकन समवयीन फ्रेंड्स सोबत अस्खलीत english बोलणाऱ्या जोशी आज्जी खरं तर जोशी काकू म्हणून आरामात खपतील. पण एक दोन नव्याने ओळख झालेल्या मैत्रिणींनी त्यांना जोशी आज्जी म्हणून संबोधित केलं आणि मी ही तीच प्रथा पुढे चालू ठेवली. ह्याच मैत्रिणींच्या बोलण्यातून जोशी आज्जींबद्दल थोडं फार कळालं ते म्हणजे आज्जी आपल्या मुलाकडे सहा महिने आणि मुंबईत सहा महिने राहतात. साधारण पंच्याहत्तरीच्या असाव्यात. अत्तिशय शिष्ठ आणि अगदी क्वचित कुणाकडे बघून हसणाऱ्या अशा आज्जींची अमेरिकन आज्ज्यांशी मात्र विशेष मैत्री जुळली होती. त्यांच्या मैत्रिणींसोबत आजी रोज राऊंड मारायच्या पार्क मध्ये.
सगळ्यांत कुतूहलाची गोष्ट आणि जी माझ्या मैत्रिणींना विशेष करून खटकायची ती म्हणजे आजी आमच्या कडे पाहून smile द्यायच्या. जशी काही जुनी ओळख असावी. कधी बोलणं नाही झालं पण हसायच्या नेहमी. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या "तुमच्या कडे बघून बऱ्या हसतात ह्या.. आम्हाला तर ओळख पण दाखवत नाहीत.. ". मला मात्र मनामध्ये कुठे तरी भारी वाटायचं. कुणी ना कुणीतरी आपल्याला विशेष महत्त्व देतं ही भावना माणसासाठी सुखद असते. मग ते कुणी का असेना. हळू हळू smile ची जागा एक दोन वाक्यं घेऊ लागली. नावं गावं .. माझी तब्येत.. ईकडच्या तिकडच्या बऱ्याच गोष्टी .. आणि एका दिवशी आम्ही पार्क मध्ये गेलो नाही तर आज्जीनी चक्क माझा नंबर मैत्रिणीकडून घेऊन मला "watsapp" वर message केला "सिद्धी सगळं बरं आहे ना. आज आली नाहीस" म्हणून. आणि तेव्हा जाणीव झाली कि आज्जी नकळत माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत. नंतर मग बऱ्याचदा बोलणं, एकमेकांकडे जाणं.. वेगवेगळ्या विषयावर गप्पा .. असं आमचं छान जमलं. आम्ही पार ओबामा पासून ते खाण्याच्या डिशेस, traveling, tv shows ..अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. गमतीची गोष्ट म्हणजे आज्जीचा favorite tv show हा बिग बॅग थिअरी होता .. आणि त्या अगदी ना चुकता अपडेट्स द्यायच्या मला.. मला म्हणायच्या तू ही बघत जा .. तुझं बाळ त्यांच्या सारख हुशार जन्मेल .. एकूणच माझ्या वयाच्या मैत्रिणी पेक्षा माझी friendship आजींशी जास्त झाली.
बघता बघता महिने गेले.. आजी परत मुंबईला गेल्या, इकडे माझी डिलिव्हरी पण झाली.. आजीनी congrats म्हणून विष केलं. त्यांच्या मुला आणि सुनेसोबत क्रिशय साठी gift हि पाठवल आणि आमचा ऋणानुबंध अजूनच दृढ झाला. सहा महीने कसे गेले काही कळलं नाही आणि आजी परत आल्याही. दार वाजलं म्हणून पाहिलं तर आजी उभ्या.. हातात डबा आणि पिशवी घेऊन. "अगं कालच land झाले.. रव्याचे लाडू आणले आहेत.. खराब व्हायचे म्हणून लगेचच द्यायला आले.."
"अहो काय आज्जी .. मनीष ला पाठवलं असतं .. तुम्ही कशाला त्रास घेतलात एवढा"
"अग त्रास कसला त्यात .. मैत्रिणींना भेटणारच होते म्हणलं जाता जाता हे देऊन जावं आणि पिल्लू ला हि भेटावं... "
"थांबा जरा थोडं बसा.. मी चहा ठेवते" असं म्हणतं मी आज्जीशी गप्पा मारू लागले.
"आज्जी मला तुमचं नवल वाटतं.. अमेरिकन मैत्रिणी बऱ्या आवडतात तुम्हाला.. आपल्या एवढ्या इंडियन आज्ज्या तिकडे कट्ट्यावर बसतात.. तुम्ही मात्र ह्यांच्यात रमता .. मग लोकं तुम्हाला शिष्ठ म्हणतात.."
"म्हणू दे ग काय म्हणायचं ते.. तुला गम्मत सांगते सिद्धी. मी पाहिलंय.. आपल्या लोकांचे विषय बहुत करून मुलं सुना.. कसं इकडे बंदी वाटतं अमेरिकेत. किती त्रास होतो येऊन जाऊन राहायला.. किती अवघड होतं इकडे गाडी नसल्या मुळे ह्यावरच असतात. अगदी क्वचित एखादी असते जी बाकी गोष्टीवर गप्पा मारते. मी आधी खूप try केलं पण नाही जमलं गणित .. मला पॉसिटीव्ह राहायला आवडतं. काही का असेना कशामुळे का असेना आलात ना तुम्ही इकडे .. सहा महिने हि सही राहताय ना.. मग जी परिस्थिती आहे ती उगाळण्यात काय मजा आहे. तुम्हाला कुणी नाही म्हणलं का गाडी शिकायला.. तुम्हाला कुठल्याही परिस्थिती मध्ये खूष राहता येऊ शकता जर मनावर घेतलं तर.. "
"अहो पण सगळ्यांना जमतच असं नाही ना .. सगळ्या कुठे तुमच्या सारख्या बोल्ड असतात आजी"
"खरंय पण माणुस ठरवलं तर खुष राहू शकतो.. अगदी कुठल्याही परिस्थितीत. आणि ते महत्वाचं.. अमेरिकन मत्रिणीं सोबत खूप वेगवेगळ्या गप्पा होतात.. त्यांचं आयुष्य independent असतं .. मुलांमध्ये खूप गुंतत नाहीत .. वेगवेगळं काही तरी करत राहतात.. अमेरिकन काय इंडियन काय .. वय रंग पैसा gender .. काही फरक पडत नाही .. माणसाचं जमणं महत्वाचं.. आता तुझ्याशी नाही का जमलं माझं .. " असं म्हणतं आज्जीनी चहा घेतला.
आजींची positivity आणि मॉडर्न पण appropriate विचार मला नेहमीच भारावून टाकायचे. खूप काही शिकायला मिळायच त्यांच्या कडून. कधी कधी हक्काने ओरडा पण खायला मिळायचा तर कधी कधी कौतुकाची थाप. त्यांच्या फॅमिली ला भेटलो होतो आम्ही मध्ये तेव्हा कळालं कि आज्जी अत्तिशय disciplined .. organized आहेत. प्राध्यापिका होत्या शाळेत. आजोबा होते तोवर त्यांनी खूप एन्जॉय केलं रिटायर्ड life. ते गेल्यावर मात्र एकट्या पडल्या आणि सहा महिने इकडे सहा महिने तिकडे अशी वारी चालू झाली. पण नेहमी उत्साही आणि खूष. कदाचित यामुळेच त्या यंग वाटत असाव्यात.
इकडे अमेरिकेत येऊन फ्रेंड्स आणि अशी नाती फॅमिली होतात. खऱ्या फॅमिली ला आपण मिस करत असतो आणि नकळत आजू बाजूच्या लोकांशी ऋणानुबंध जोडत जातो. त्यांच्यात आपण आपल्या लोकांना कुठे ना कुठे तरी शोधत असतो हे खरं. कदाचित मी हि आज्जींमध्ये कुणाला तरी शोधत होते. पण आज्जी माझ्या मध्ये काय शोधत होत्या? त्यांचा मुलगा आणि सून स्वभावाने खूपच छान.. नातवंडांना ही आज्जींविषयी फार प्रेम.. त्यामुळे सगळी नाती आज्जीची तशी खूप छान होती.. फॅमिली खूप केअरिंग होती.. मग आज्जी काय शोधत असाव्या माझ्यात? मनीष सोबत हि त्या फारच आपुलकीने वागायच्या .. क्रिशय चे तर खूप लाड चालायचे. त्यांना पहिला कि लगेच "जी जी " चालू व्हायचं त्याचं.
माझ्या डोक्यात हा प्रश्न मात्र सतत पिंगा घालायचा. मनीष म्हणतो तू फारच विचार करतेस प्रत्येक गोष्टीचा. त्या एवढं प्रेमाने करतात.. आता त्यातही काय तुझं. पण लवकरच हा गुंता सुटला. बाकी कुणाकडेही न बघणाऱ्या आजी माझ्याशी एवढ्या कशा जवळ आल्या ह्याचा उलगडा झाला जेव्हा त्यांची फॅमिली डिनर ला आली. डिनर आटोपून मी kitchen ची आवरा आवर करत होते.. आज्जी क्रिशय सोबत काही गप्पा मारत बसल्या होत्या.. तेवढ्यात मीनलताई (आजींची सून) मला मदत करायला म्हणून आली..
"सिद्धी थँक यू .. खरंच मला मनापासून तुझे आभार मानायचे होते"
"अगं ताई .. आभार कसले .. साधा स्वयंपाक तर होता .. आपण आता घरचेच आहोत .. formality कसली .. आणि तू ती भांडी राहू देत .. मी आवरते .. "
"नाही गं त्या साठी नाही.. आईंसाठी .. बरेच दिवस झाले म्हणलं तुला सांगावं .. तुझ्याशी बोलावं निवांत ह्या बाबतीत.. पण तशी वेळच आली नाही .. " असं म्हणत ताईने फोन काढला. मला काहीच कळत नव्हतं ती काय बोलते आहे ते. ताई फोन वरील photos swipe करू लागली आणि एका फोटो वर येऊन थांबली. माझ्या दिशेने फोन नेत म्हटली "हा फोटो बघ .."
मी फोटो पाहिला आणि मला प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला. तो फोटो exactly माझ्या सारख्या दिसणाऱ्या मुलीचा.. नव्हे .. माझाच जुना फोटो असावा. मी निरखून तो फोटो पाहू लागले आणि मेंदूला चालना देऊ लागले .. आठवायचा प्रयत्न करत की हा फोटो कुठला आणि कधीचा .. माझा नक्कीच नाही .. छे छे माझाच तो .. पण एवढा जुना कसा काय .. एकूणच माझा चेहरा माझे सगळे हाव भाव एखाद्या movie प्रमाणे दाखवत असावा .. ते पाहून ताई हसली .. म्हणाली
"नको विचार करुस फार .. काही आठवणार नाही .. कारण हा फोटो तुझा नाही." मी अजूनही ताई कडे आ वासून पाहात होते ..
"हा माझ्या नणंदेचा आहे .. तीच नाव श्रद्धा.. एकदम तुझ्या सारखी .. नव्हे .. तुझी जुळी बहीणच वाटावी अशी आहे ना ?"
"हो ताई .. अगदी .. कुठे असतात ह्या .. माझ्या पेक्षा मोठ्या असणार नक्की .. त्यामुळे आता वेगळ्या दिसत असतील नाही ?"
"नाही गं .. अजूनही तुझ्या सारखीच दिसते .. कारण ती आता ह्या जगात नाही .. तुझ्या पेक्षा थोडी लहान असताना वारली.. त्यामुळे आमच्या डोळ्या समोर तिची तीच छबी आहे.. "
हे ऐकून मी स्तब्ध झाले.. इतके दिवस झाले पण आज्जी कशा कधी काही बोलल्या नाहीत तिच्या बद्दल .. ताई पुढे बोलत होती
"मी आणि शिरीष कॉलेज मध्ये एक मेकांच्या प्रेमात पडलो .. श्रद्धा आमच्या पेक्षा ३ वर्षांनी लहान .. अत्तिशय स्मार्ट .. खूप मनमिळाऊ आणि भरपूर उत्साही होती श्रद्धा.. त्या काळात तिने अगदी तुझ्या सारखी कॉम्प्युटर इंजिनिर व्हायच म्हणून हट्ट धरला होता.. इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षांत अचानक ताप आला आणि एका रात्रीत पोर गेली.. आईंना आणि आबांना तेव्हा जो धक्का बसला त्या नंतर त्यांनी जगणं जसं काही सोडून दिलं .. आयुष्य पुढे चालत राहत गं .. आमचं लग्न झालं आम्ही इथे आलो .. पण जेव्हा पासून श्रद्धा गेली तेव्हा पासून आई आबांनी ओळखी एकदम कमी केल्या .. श्रद्धा होती त्या आधीच्या कुठल्याच लोकांशी आणि नातलगांशी बोलणं कमी .. एकदम बंदच केल.. कुणाही ओळखीच्या लोकांना पाहिलं कि त्यांना श्रद्धा नसल्याची उणीव भासायची .. मैत्रिणी मित्र सगळे आपापल्या मुलींबद्दल कौतुकाने बोलायचे .. पण त्यांना श्रद्धा आठवून सहन नाही व्हायचं .. दाखवायचे नाहीत गं ते .. पण आत मध्ये खूप सल होता .. स्वतःच्या वयाच्या मुलं बाळांविषयी चर्चा करणाऱ्या सगळ्या लोकांपासून त्यांनी दुरावा केला .. लोक दुखावली हि गेली .. पण त्यांनी अगदी strictly follow केलं हे.. बाकी आयुष्यात नेहमी positive राहतात आई पण आत मध्ये श्रद्धा कुठे तरी आहेच त्यांच्या आणि राहणार .. मला वाटतं तुझ्या मध्ये त्यांनी श्रद्धा शोधली .. तू अगदी तिच्या सारखीच आहेस .. तुझ्या सोबत त्या श्रद्धा ला जगत आहेत पुन्हा .. त्या दिवशी नकळत मला श्रद्धा च्या घरी जायचंय म्हणाल्या .. आणि तू ही त्यांना जवळ केलंस ... त्यांच्याशी ऋणानुबंध जोडलास .. शिरीष म्हणतो अगदी १००% नाही पण आई परत पहिल्या सारखी वाटते .. कधी नव्हे ते आईंनी पर्वा जुन्या मत्रिणींना फोन लावून गप्पा मारल्या मन मोकळे पणाने.. खरंच अगदी मनापासून थँक यू "
ताई बोलतच होती आणि मी मात्र श्रद्धा च्या फोटो ला एकटक न्याहाळत होते .. कधी फोटो कडे तर कधी जोशी आज्जींकडे.. आजी एकदम खुलून हसत होत्या . माझ्या मध्ये त्यांना त्यांची श्रद्धा मिळाली .. मला त्यांच्या मध्ये एक प्रेमळ caring अगदी माझ्या आज्जीसारखी आज्जी मिळाली ..
खरंच आपण एखाद्याला किती सहजपणे judge करतो .. आज्जींच्या अमेरिकन मैत्रिणी पाहून वाटणारा अचंबा .. त्यांचा शिष्ठ वाटणारा स्वभाव.. आणि जेव्हा ओळख झाली तेव्हा कळून आलेला त्यांचा अनोखा पॉसिटीव्ह स्वभाव .. ह्यामागे एवढं मोठ्ठ दुःख लपलं असेल असं कधी वाटलं नव्हतं..! हे ऋणानुबंध कसे कधी आणि का जुळतात हे देवच जाणे .. पण माणसाच्या आयुष्यात खूप काही देऊन जातात.. जगाच्या पाठीवर कुठेही का असेना .. तुम्हाला तुमची वाटणारी .. कधी कधी तुमच्या माणसांहून अधिक प्रेम करणारी अशी माणसं मिळणं हे भाग्यच ! त्यांना जपून ठेवणं तेवढंच महत्वाचं.
आता एप्रिल चालू झालाय .. आज्जीना यायला फक्त दोन महिने उरलेत .. मी वाट पाहतेय .. रव्याच्या लाडवांची !
Comments
Post a Comment